….भारतकुमार राऊत
आजपासून बरोबर 86 वर्षांपूर्वी 1931 साली भारतीय चित्रपटाला कंठ फुटला आणि तो हिंदी/उर्दूत बोलू लागला. अर्देशर इराणी यांनी दिग्दर्शित केलेला पहिला भारतीय बोलपट, ‘आलम आरा’ मुंबईच्या मॅजेस्टिक चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आणि `बोलणारा, गाणारा सिनेमा’ पाहण्यासाठी प्रेक्षकांनी तोबा गर्दी केली. अखेर गर्दी आवरण्यासाठी चित्रपटगृहावर पोलिसांना पाचारण करावे लागले. इंपिरियल मुव्हीटोन या कंपनीने हा चित्रपट निर्माण केला.


त्यानंतर वर्षभरातच, 1932 साली पहिला मराठी बोलपट, ‘अयोध्येचा राजा’ प्रदर्शित झाला. दादासाहेब फाळके यांनी पहिला भारतीय चित्रपट ‘राजा हरिश्चंद्र’ 1913 साली निर्माण केल्यानंतर अवघ्या 18 वर्षांत भारतीय चित्रपटसृष्टीत ही दुसरी क्रांती झाली.
‘आलम आरा’ या बोलपटात मास्टर विठ्ठल व पृथ्वीराज कपूर यांच्या मुख्य भूमिका होत्या. आलम आराच्या भूमिकेत झुबिदा ही रुपवान व गोड गळ्याची अभिनेत्री होती. या चित्रपटातील `दे दो खुदा के नाम’ हे फकिरांवर चितारलेले गीत खूप लोकप्रिय झाले होते. ते व्रजर महम्मद खान यांनी गायले.
दुर्दैवाने `आलम आरा’ या चित्रपटाची एकही प्रिंट आज उपलब्ध नाही.


1965 नंतर ती कुणी पाहिली नाही, असे म्हटले जाते. पुण्यातील फिल्म अर्काइव्हला 2003 मध्ये लागलेल्या आगीत ही प्रिंट जळाली, असे म्हटले जात होते. पण त्याचा इन्कार अर्काइव्हचे संस्थापक, संचालक आर के नायर यांनी केला. ‘आलम आरा’ची प्रिंट अर्काइव्हजकडे केव्हाही नव्हतीच असे त्यांनी स्पष्ट केले.
भारतीय चित्रपटाला बोलायला शिकवणारा चित्रपट आज उपलब्ध नाही, हे दुर्दैव. पण ‘आलम आरा’ने एक गौरवशाली इतिहास रचला, हे मात्र खरे!-
….भारतकुमार राऊत