स्वप्निल जोशी, नितीश भारद्वाज, सई ताम्हणकर आणि तेजस्विनी पंडीत यांच्या अभिनयाने नटलेल्या‘समांतर-२’ला ‘एमएक्स प्लेयर’वर मोठा प्रतिसाद,
‘जीसिम्स’च्या अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार यांची निर्मिती असलेल्या ‘समांतर-२’ला उत्स्फूर्त प्रतिसाद, ५६ दशलक्षहूनही अधिक प्रेक्षकसंख्या
Marathi Web Series Samantar – 2
पहिल्या सिझनला जो प्रतिसाद मिळाला त्याची पुनरुक्ती करत ‘समांतर’च्या दुसऱ्या सिझनलासुद्धा प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत असून आत्तापर्यंततिला ५६ दशलक्ष प्रेक्षकसंख्या प्राप्त झाली आहे. ‘एमएक्स प्लेयर’वर अलीकडेच ही वेबसिरीज सुरु झाली. ‘समांतर’च्या पहिल्या सिझनच्या यशानंतर दुसरा सिझन ‘एमएक्स प्लेयर’वर १ जुलै २०२१ रोजीदाखल झाला. या वेबसिरीजची निर्मिती जीसिम्स (ग्लोबल स्पोर्ट्स एंटरटेन्मेंट अँड मिडिया सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड)ची असून या कंपनीचे प्रमुख अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार हे आहेत. ही मालिका प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरत आहे. नितीश भारद्वाज, स्वप्निल जोशी आणि तेजस्विनी पंडित यांसारख्या प्रतिभावान कलाकारांनी या वेब सिरीजला दर्जा मिळवून दिला आहे. या वेब सिरीजच्या दुसऱ्या भागामध्ये रुपेरी पडद्यावरील ग्लॅमरस व्यक्तीमत्व सई ताम्हणकरसुद्धा महत्वाच्या भूमिकेत आहे.
“समांतर-२’ला भरभरून यश मिळणार याबाबत आम्हाला खात्री होती, कारण यातील सर्वच गोष्टी अचूकपणे जुळून आल्या आहेत. दुसऱ्या भागाला जो प्रतिसाद मिळतो आहे, त्याने मला खूप आनंद झाला आहे. मला याचाही आनंद आहे की मी माझ्या करियरमध्ये जे नवीन प्रयोग करत आहे त्यांना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद लाभतो आहे. या सर्व यशाचे श्रेय खासकरून निर्माते अर्जुन आणि कार्तिक यांना तसेच दिग्दर्शक समीर विद्वांस यांना आहे. त्यांनी सर्जनशिलतेच्या बाबतीत जे श्रम घेतले आणि चित्रीकरणाच्या बाबतीत जो दर्जा सांभाळला त्याला तोड नाही,” असे उद्गार अभिनेता स्वप्निल जोशी यांनी काढले आहेत. ते या मालिकेत कुमार महाजन या प्रमुख व्यक्तिरेखेच्या भूमिकेत आहेत.
स्वप्निल यांनी पहिल्या सिझनच्यावेळी ‘समांतर’ची संपूर्ण टीम कोल्हापूर येथे आलेल्या पुरामध्ये १३ दिवस कशी अडकून पडली होती, याची आठवण उधृत केली आहे. “कोल्हापूर, सांगली, सातारा या भागात ऑगस्ट २०१९ मध्ये मोठ्या प्रमाणावर पूर आला होता. संपूर्ण जिल्हे जलमय झाले होते. आम्ही तेव्हा ‘समांतर-१’चे चित्रिकरण कोल्हापूर येथे करत होतो. या पुराचा कहर एवढा मोठा होता की संपूर्ण चमू तब्बल १३ दिवस एका हॉटेलमध्ये अडकून पडला होता. त्यावेळी अर्जुन आणि कार्तिक यांनी संपूर्ण चमूची काळजी घेत आम्हा कोणालाही कशाचाही त्रास होणार नाही, असे पहिले. ते दिवस विसरता येण्यासारखे नाहीत. आज चित्रिकरणादरम्यान जेव्हा कधी त्या दिवसांची आठवण होते, तेव्हा अंगावर अक्षरशः काटा उभा राहतो,” ते म्हणतात.
‘समांतर-२’बद्दल आमच्याशी गप्पा मारताना अर्जुन आणि कार्तिक म्हणाले, “समांतर’ची कथाच खूप सुरेख आहे आणि ती मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांना आवडेल याबाबत आम्हाला खात्री होती. ‘समांतर-२’ला जो प्रतिसाद मिळाला आहे त्याबद्दल आम्ही खूप आनंदी आहोत. आम्हाला विविध विषय व प्रकारांवर आधारित अशा आणखीही वेब सिरीजची निर्मिती करायची आहे.”
स्वप्निल जोशी आणि नितीश भारद्वाज यांना एकत्रित या वेब सिरीजमध्ये आणण्याच्या आपल्या निर्णयाबद्दलही निर्मात्यांनी खुलासेवार सांगितले. “जगभरात या दोघांना त्यांनी दोन वेगळ्या मालिकांमध्ये केलेल्या कृष्णाच्या भूमिकांसाठी ओळखले जाते. ‘समांतर’च्या माध्यमातून या दोन प्रतिभावान कलाकारांना समोरासमोर पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळते आहे. त्याचप्रमाणे आम्ही जेव्हा सई ताम्हणकरची सुंदरा व मिराच्या व्यक्तिरेखांसाठी निवड केली तेव्हा अनेक नावे आम्हाला सुचवली गेली होती. परंतु आम्ही सईच्या नावावर ठाम होतो. आम्हाला माहित होते की, सुंदराच्या व्यक्तिरेखेला केवळ तीच न्याय देऊ शकेल,” अर्जुन आणि कार्तिक म्हणाले.
‘जीसिम्स’ने मराठीमध्ये अनेक गाजलेले चित्रपट दिले आहेत. मोगरा फुलला, बोनस, फुगे, तुला कळणार नाही, रणांगण आणि विकी वेलिंगकर यांचा त्यांत समावेश आहे. ‘नक्सलबारी’ ही ‘झी-5’वर प्रदर्शित झालेली आणि ‘एमएक्स प्लेयर’वरील समांतर १ व २ यांच्या माध्यमातून जीसिम्सने पुन्हा एकदा तो एक दर्जेदार निर्मिती करणारा आघाडीचा स्टुडीओ असल्याचे सिद्ध केले आहे.