आपण आत्तापर्यंत पुनर्जन्मावर आधारित अनेक मालिका, चित्रपट बघितले असतील, ज्यात मागील आयुष्यात घडलेल्या घटना पुन्हा नव्याने घडू लागतात.
पण समांतर, हि गोष्ट थोडी वेगळी आहे. नावा प्रमाणेच समांतर…
Marathi WebSeries – SAMANTAR – समांतर
समांतर हि मराठी वेब सिरीज , सुहास शिरवाळकर यांच्या समांतर या कादंबरीवर आधारित आहे, ज्याचे दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केले आहे, स्वप्नील जोशी या वेब सिरीजमध्ये मुख्य भूमीत आहे.
हि गोष्ट आहे कुमार या मध्यम वयीन कमनशिबी तरुणाची, कमनशिबी यासाठी कि त्याच्या आयुष्यात नेहमीच काहीतरी वाईट घडत असते, स्वतःच्या नशिबाविषयी सांगताना तो स्वतः एकदा म्हणतो “मी जेव्हा रेल्वेचे तिकीट काढायला जातो, जेव्हा माझा नंबर येतो तेव्हा खिडकी बंद होते ..”. कुटुंबावर खूप प्रेम करतो पण त्यांच्या गरजा पूर्ण नाही करू शकत म्हणून आतल्याआत हळू हळू तो तुटत असतो. अश्यातच त्याचा मित्र त्याला एका स्वामीजींना विषयी सांगतो. मुळात नास्तिक असल्याने कुमारचा देवावर किंवा स्वामीजींवर अजिबात विश्वास नसतो. पण मित्राच्या सांगण्यामुळे तो स्वामीजींना भेटायचे ठरवतो. ज्यावेळेस तो स्वामीजींना स्वतःचा हात दाखवतो तेव्हा स्वामीजी कुमारला सांगतात, हा हात त्यांनी आधी पाहिलाय आणि त्यावेळीही त्यांनी भविष्य सांगितले नव्हते आणि आताही नाही सांगणार . हे ऐकून कुमार चिडतो, त्याला आता त्याचे भविष्य जाणून घ्यायचे असते. पण त्याच्याकडे असते फक्त एक नाव “सुदर्शन चक्रपाणी”.
या नावाच्या शोधात कुमारचा पुढील प्रवास सुरु होतो. याच प्रवासात त्याला जाणवू लागते, ज्या गोष्टी या सुदर्शनच्या आयुष्यात होऊन गेल्या आहेत त्या त्याच्या आयुष्यात घडत आहेत किंवा घडणार आहेत.
म्हणजेच एकाच भूतकाळ हा दुसऱ्याचा भविष्यकाळ आहे..
कुमारचा हा प्रवास, त्याच्या मनाची घालमेळ, या स्थितीत त्याचे त्याच्या कुटुंबासोबत असलेले संबंध हे दिगर्शक सतीश राजवाडे यांनी खूप छान पद्धतीने दाखवले आहेत. या मालिकेतील प्रत्येक भाग हा वेगवान आहे. मालिका बघताना अजिबात कंटाळा येत नाही प्रत्येक छोटा छोटा संदर्भ कुमारला सुदर्शन चक्रपाणी च्या दिशेत नेत असतो. हि वेब सिरीज मराठी भाषेसह हिंदी, तामिळ आणि तेलगू मध्ये सुद्धा पाहता येईल.
लवकरच या वेब सिरीज चा दुसरा भाग प्रदर्शित होणार आहे.