

जर तुम्ही ‘स्पेशल ऑप्स’ आणि ‘स्पेशल ऑप्स २’ चे चाहते असाल आणि तुम्हाला के के मेनन यांच्या ‘हिम्मत सिंग’ सारखेच आणखी काही धाडसी आणि हुशार गुप्तहेर बघायचे असतील, तर आम्ही तुमच्यासाठी एक खास यादी घेऊन आलो आहोत. हे शो तुम्हाला नक्कीच आवडतील आणि तुमच्या अंगावर शहारे आणतील. हे सर्व शो नेटफ्लिक्स, सोनी लिव्ह, जिओ सिनेमा आणि हॉटस्टार सारख्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत.
१. फॅमिली मॅन (ॲमेझॉन प्राइम व्हिडिओ)
- कलाकार: मनोज बाजपेयी, शारीब हाश्मी, प्रियामणी, समंथा रुथ प्रभू
- दिग्दर्शक: राज आणि डीके


मनोज बाजपेयी यांचा ‘फॅमिली मॅन’ हा एक असा शो आहे, जो प्रत्येक स्पाय थ्रिलर चाहत्याच्या यादीत असायलाच हवा. यात श्रीकांत तिवारी नावाचा एक मध्यमवर्गीय माणूस आहे, जो गुप्तपणे एका गुप्तचर संस्थेसाठी काम करतो. श्रीकांत तिवारीला एकाच वेळी आपल्या कुटुंबाची आणि देशाची जबाबदारी सांभाळावी लागते. त्याचा सहकारी, जेके (शारीब हाश्मी) सोबतची त्याची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडते. ही सिरीज तुम्हाला हसवते, रडवते आणि त्याच वेळी देशाच्या सुरक्षेबद्दल गंभीर विचार करायला लावते.
२. द नाईट मॅनेजर (जिओ हॉटस्टार)
- कलाकार: अनिल कपूर, आदित्य रॉय कपूर, शोभिता धुलिपाला, तिलोत्तमा शोम
- दिग्दर्शक: संदीप मोदी


अनिल कपूर आणि आदित्य रॉय कपूर यांची मुख्य भूमिका असलेला हा शो अतिशय स्टायलिश आणि आकर्षक आहे. हॉटेलचा नाईट मॅनेजर शान सेनगुप्ता (आदित्य रॉय कपूर) कसा एका आंतरराष्ट्रीय शस्त्र विक्रेता शैली रुंगटा (अनिल कपूर) याच्या विश्वासात घुसतो, हे पाहणे खूपच रोमांचक आहे. शोमधील भव्य लोकेशन्स, जबरदस्त सिनेमॅटोग्राफी आणि कलाकारांचा दमदार अभिनय या सिरीजला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतो.
३. मुखबिर – द स्टोरी ऑफ अ स्पाय (झी ५)
- कलाकार: झैन खान दुर्रानी, प्रकाश राज, आदिल हुसैन, बरखा बिश्त
- दिग्दर्शक: शिवम नायर, जयप्रद देसाई


१९६५ च्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित, ‘मुखबिर’ ही एका सामान्य माणसाची कथा आहे, जो देशासाठी गुप्तहेर बनून पाकिस्तानात जातो. ही एका सामान्य चोऱ्या करणाऱ्या तरुणाची कथा आहे, ज्याला रॉ एजंट बनवून पाकिस्तानमध्ये एका गुप्त मोहिमेवर पाठवले जाते. १९६५ च्या युद्धावेळी भारताला महत्त्वाची माहिती पुरवणाऱ्या या अज्ञात नायकाची ही कथा तुमच्या मनात देशभक्तीची भावना जागवेल.
४. बार्ड ऑफ ब्लड (नेटफ्लिक्स)
- कलाकार: इम्रान हाश्मी, विनीत कुमार सिंग, शोभिता धुलिपाला, कीर्ती कुल्हारी
- दिग्दर्शक: रिभू दासगुप्ता


शाहरुख खानच्या रेड चिलीज एंटरटेनमेंटने या सिरीजची निर्मिती केली आहे. कबीर आनंद उर्फ ॲडोनिस (इम्रान हाश्मी) या निलंबित एजंटला काही भारतीय गुप्तहेरांना वाचवण्यासाठी एका धोकादायक मोहिमेसाठी परत बोलावले जाते. बलुचिस्तानच्या धोकादायक प्रदेशात घडणारी ही कथा राजकारण, थरार आणि जबरदस्त ॲक्शनने परिपूर्ण आहे.
५. तणाव (सोनी लिव्ह)
- कलाकार: मानव विज, अरबाज खान, रजत कपूर, सुमित कौल
- दिग्दर्शक: सुधीर मिश्रा, सचिन ममता कृष्ण


हा शो ‘फौदा’ या प्रसिद्ध इस्त्रायली शोचा अधिकृत भारतीय रिमेक आहे. काश्मीरमधील राजकीय आणि सामाजिक तणावाचे चित्रण करणारी ही सिरीज, स्पेशल टास्क ग्रुप आणि दहशतवादी यांच्यातील संघर्षावर आधारित आहे. यात दोन्ही बाजूंची मानवी कथा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, ज्यामुळे हा शो अधिक वास्तविक आणि प्रभावी वाटतो.
६. द फ्रीलांसर (जिओ हॉटस्टार)
- कलाकार: मोहित रैना, अनुपम खेर, काश्मिरा परदेशी
- दिग्दर्शक: भाव धुलिया (निर्माता: नीरज पांडे)


‘स्पेशल ऑप्स’चे निर्माते नीरज पांडे यांची ही आणखी एक उत्कृष्ट निर्मिती आहे. एका माजी पोलीस अधिकाऱ्याची कथा, जो सीरियामध्ये ISIS च्या तावडीत अडकलेल्या एका मुलीला वाचवण्यासाठी धोकादायक मोहिमेवर जातो. अविनाश कामत (मोहित रैना) कशाप्रकारे ही अशक्य वाटणारी मोहीम आखतो आणि पूर्ण करतो, हे पाहणे थरारक आहे.
७. कॅट (नेटफ्लिक्स)
- कलाकार: रणदीप हुड्डा, सुविंदर विक्की, हसलीन कौर
- दिग्दर्शक: बलविंदर सिंग जंजुआ


गुरनाम सिंग (रणदीप हुड्डा) नावाचा एक सामान्य माणूस, जो पूर्वी पोलिसांसाठी खबऱ्या (CAT) म्हणून काम करत होता, त्याला आपल्या भावाच्या आयुष्यासाठी पुन्हा एकदा या गुन्हेगारीच्या आणि राजकारणाच्या जगात उतरावे लागते. पंजाबमधील ड्रग्सची समस्या आणि त्यामागील राजकारण यावर ही सिरीज एक दाहक वास्तव मांडते. रणदीप हुड्डाचा दमदार अभिनय या शोची खासियत आहे.
तर मग विचार काय करताय? पॉपकॉर्न तयार ठेवा आणि या वीकेंडला हे जबरदस्त स्पाय थ्रिलर शो बघायला सुरुवात करा!