युद्ध कथांवर आधारित अनेक चित्रपट आणि वेब मालिका आपण पहिल्या असतील, युध्दाचा चित्रपट म्हटले कि मला तरी सर्वात प्रथम डोक्यात येतो तो एकच चित्रपट “बॉर्डर”. तसे हॉलिवूड मध्ये अनेक उत्तम युद्धपट आहेत. पण बॉर्डर आपल्याला जवळचा वाटतो. आजही अनेकदा जेव्हा पुन्हा बॉर्डर बघतो तेव्हा बऱ्याच प्रसंगांमध्ये अंगावर काटा येतो. जे. पी. दत्ता यांच्या बॉर्डरमध्ये, कथा, संगीत, दिग्दर्शन, कलाकारांची निवड त्यांचा अभिनय सगळे ऊत्तम जमून आलेले. बॉर्डर नंतर जे. पी. दत्ता यांचेच दोन युद्धपट आले, LOC कारगिल आणि पलटण पण बॉर्डर समोर दोन्ही पण फिके पडतात.
आज आपण बोलत आहोत अश्याच एका युद्धावर आधारित वेब मालिके विषयी, १९६२-द वॉर इन द हिल्स
1962-War in the hills Web series Review in Marathi


नावावरूनच लक्ष्यात येते हि मालिका भारत आणि चीन यांच्या १९६२ साली झालेल्या युद्धावर आधारित आहे. १९६२-द वॉर इन द हिल्स या मालिकेचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले आहे तर या मालिकेची निर्माती अरे स्टुडिओज या बॅनर खाली झाली आहे. या मालिकेत ४५-५० मिनिटांचे एकूण १० भाग आहेत. म्हणजेच जवळ जवळ ८ तासांची हि एक संपूर्ण मालिका आहे.
१९६२-द वॉर इन द हिल्स या मालिकेत अभय देओल, मेजर सुरज सिंग या मुख्य भूमिकेत आहे. सोबतच आकाश ठोसर, सुमित व्यास, माही गिल, विनीत शर्मा, मियाँग चँग, अनुप सोनी, पूजा सावंत, हेमल इंगळे असे अनेक कलाकार महत्वाच्या भूमिकेत आहेत. चित्रपटात महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्या मांजरेकर सुद्धा छोट्या पण महत्वाच्या भूमिकेत आहे.
मालिकेविषयी बोलायचे तर मालिकेचे सुरुवातीचे काही भाग हे भारत चीन यांच्यातील नेफा(आसाम आणि अरुणाचल प्रदेश) मध्ये झालेल्या युद्धावर आहेत तर शेवटचे भाग हे लडाख मधील युद्धावर आधारित आहेत. १२५ भारतीय सैनिकांनी कसे ३००० चिनी सैनिकांना रोखून धरले हे दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना दाखवायचे होते पण ते तसे जमले नाही.
मुळात मालिकेतील पात्रांची निवडक चुकीची वाटते. अभय देओल हा चांगला कलाकार आहे पण इथे मेजर च्या भूमिकेत तो अजिबात खरा वाटत नाही, त्याने सनी देओल प्रमाणे अभिनय करावा अशी अपेक्षाच नाही, पण एका सैनिका मध्ये जो जोश असतो तो त्याच्यात अजिबात दिसत नाही.
१० भागांच्या या मालिकेत युद्धाचे भाग हे खूपच कमी आहेत, मालिकेत सुट्टीवर घरी आलेले सैनिक त्यांचे कुटुंब त्यांच्या समस्या, त्यांचे प्रेम अश्या अनेक छोट्या मोठ्या गोष्टी दाखवण्यावर जास्त भर देण्यात आला आहे. हि मालिका युद्धावर आधारित असली तरी एकाहि प्रसंगामध्ये अंगावर काटा येणे वगैरे काहीही होत नाही. VFX किंवा ग्राफिक्स च्या चुकीच्या वापरामुळे युद्धाचे प्रसंग पण खूप खोटे वाटतात.
मालिकेत पंडित नेहरू आणि आर्मी जनरल यांच्यातील संभाषण अनेकदा आहे, ज्यात इंदिरा गांधी पण भाग घेतात पण हे संपूर्ण बंद खोलीतील संभाषण पूर्णपणे नाटकी वाटते.
चित्रपटाची जमेची बाजू म्हणजे मियाँग चँग यांनी रंगवलेला मेजर लिन, सुरुवातील तो फार क्रूर भासतो. पण शेवटी मेजर सुरज ला उद्देशून तो बोलतो.
तुम दुश्मन हो, पर मैं तुम्हे सॅल्यूट करता हु, तुम एक जाबाज सिपाही हो.
पूजा सावंत आणि हेमल इंगळे यांचा अभिनय उत्तम झालाय. आकाश आणि हेमल ची जोडी पण छान वाटते.
मालिकेतील शेवटच्या भागात १२५ विरुद्ध ३००० सामना दाखवण्यात आलाय, यात मेजर सुरजच्या काही युक्त्या दाखवल्या गेल्या आहेत तरी सुद्धा हा भाग अधिक चांगल्या पद्धतीने करता आला असता.
थोडक्यात युद्धपट किंवा ऍक्शन बघण्यासाठी हि मालिका बघणार असाल तर हि आपल्यासाठी नाही. खूप वेळ असेल आणि करायला काहीच नसेल तर नक्कीच आपण हॉटस्टार वर १९६२-द वॉर इन द हिल्स ही मालिका पाहू शकता.